Tuesday, November 13, 2007

'प्रेषित'

सातारा ते कराड यांच्या दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक ४ वरुन एक मोटार चालली होती. मोटारीत पुढच्या सीटवर एक जोडपे बसले होते आणि मागच्या सीटवर पुष्कळ सामान भरले होते. नवरा मोटार चालवत होता आणि बायको तोंडाचा पट्टा. मालिनीचे सर्वच बोलणे ऐकले पाहिजे आणि ऐकण्याजोगे असते असे सुधाकरला लग्नापूर्वीच्या दिवसात वाटायचे. लग्न झाल्यावर दोनच आठवड्यांत त्याचे मत बदलले. बायकोचे बोलणे चालू असताना मधूनमधून हूंकार देत राहिले की तिचे समाधान होते हे त्याने ओळखले. केव्हा होकार द्यायचा, नकार द्यायचा, आश्चर्य व्यक्त करायचे, आणि ते सुध्दा बोलणे न ऐकता! - ही कला त्याला आता दहा वर्षाच्या अनुभवाने साध्य झाली होती. फार तर पाच टक्के त्याचा अंदाज चुके, पण तेवढी चूक त्यांच्या संसारात व्यत्यय आणत नसे.

- डॉ. जयंत नारळीकर
'प्रेषित' (विज्ञान-कादंबरी)

-------------------------------------------------------------
समीरने सांगितलं, "हे चांगलं आहे.. जास्त विचार न करता घे."
मी 'प्रेषित' घेतलं, वाचलं आणि आवडलं.

No comments: