पुस्तक वाचणं नेहमीच चांगलं. प्रत्येक पुस्तक काही ना काही तरी देऊन जातंच. याचा अर्थ असा नाही की सगळीच पुस्तकं चांगली असतात.
चांगली पुस्तकं आपल्याला चांगलं काहीतरी देऊन जातातच. मग ते काहीही असो - ज्ञान, मनोरंजन, काहीही! ज्ञानवर्धक वाचणं म्हणजे कधी कधी कंटाळवाणं असतं, पण ते आयुष्याला पुरतं. मनोरंजक वाचणं म्हणजे मजेशीर असतं, पण ते कधी कधी क्षणभंगुर असतं. पण वाचायला तर लागतच. आणि प्रत्येकाने खुप काही वाचावं, काहीही वाचावं आणि कधी कधी तर विनाकारणही वाचावं. कोणीतरी सांगून पण ठेवलयं - "वाचाल तर वाचाल".
वाईट पुस्तकं - म्हंजे चांगलं content नसलेली पुस्तकं (इथे मला साठी योग्य मराठी शब्द सापडला नाहीये, याची सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी) ही पुस्तकं पण आपल्याला नाही बोलून बरंच काही देऊन जातात. म्हणजे ते वाचल्यावर याचा तरी बोध होतो की जे वाचलयं ते वाईट होतं म्हणजेच आपल्याला काही तरी त्या पुस्तकाविषयी समजतच की नाही? म्हंजे, पुढल्या वेळी आपण या लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या वाटेलाच जाऊ नये, एवढी तरी शिकवणी मिळते. शिवाय, हल्ली आपल्यात एक खोड आलीये, एखादी गोष्ट खटकली वा आवडली, की ती लगेच फेबुवर टाकायची आणि टिवटिवाट करायचा. म्हणजे आपल्या बाबतीत घडलेलं चांगलं / वाईट पण आपण share करतो आणि त्यामुळे दुनिया वाचते. (हे "वाचते" म्हणजे, वाचन करते अस्सं नाही रे... वाचते.. वाचते... बोट बुडताना बुडणार्याला हात दिला की त्याचे प्राण वाचतात ना.. तो हा "वाचते"... म्हणजे दुनिया वाचते) (मराठी भाषा हवी तशी वळते असं आपण म्हणतो... पण मला वाटतं कदाचित प्रत्येकजण आप-आपल्या भाषेविषयी हेच म्हणत असेल) आणि दुनिया वाचते, म्हणून आपल्याला पूण्य मिळतं.
पुस्तकांविषयी अजुन एक सांगायचं असं की, लेखकाची लेखनशैली! त्यावर लोक जास्त फिदा होतात आणि त्या लेखकाचं जास्तीत जास्त वाचतात आणि मुख्य म्हणजे ती शैली आवडल्यामुळे त्यावर विश्वास पण ठेवतात.
पण समजा, एखादा वीर आहे जो खरा नायक आहे आणि त्याच्या विषयी जर एखाद्या चांगल्या लेखकाने त्याच्या चांगल्या शैलीमध्ये वाईट लिहिलं तरी त्याचं ते लिखाण वाचकांना आवडतं. (या ठिकाणी लेखकाने असं खोटं का लिहिलं, त्यात शिरण्यात मला स्वारस्य नाहीये) ते त्याच्या वर विश्वास पण ठेवतात. आणि अशामुळे तो नायक विनाकारण खलनायक होतो. पुढे कधीतरी सत्याची उकल होते. कोणातरी चांगली लेखन-शैली नसलेला लेखकाला सत्याची जाण होते, तो आपल्या परीने ते खरं लिहितो, कसा-बसा प्रकाशक मिळवतो, खर्या नायकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचं लिखाणच चांगलं नसल्यामुळे ते वाचलं जात नाही आणि वाचलं गेलं तरी लेखन शैली चांगली नसल्यामुळे लोक ते पसंत करत नाहीत आणि मग सत्य अंधारातच रहातं. तर हा लेखन शैलीचा भाग झाला, की ज्यामुळे खरं तर पुस्तकं खपली जातात. आणि विश्वासली सुध्दा जातात.
माझं शेवटचं संपवलेलं पुस्तक - The Immortals of Meluha. हे वाचावं म्हणून २-३ मित्रांनी सांगितलं होतं. ऑफिसमध्ये दोघे जण तर वाचत पण होते. हे इंग्रजी मध्ये असल्यामुळे आधीच कमालीचं धैर्य लागलं सुरुवात करायला... पण नंतर ते अंग-वळणी पडलं. नंतर मी एक मार्कर पण विकत घेतला... पुस्तक वाचत असताना तो सोबत ठेवला आणि अडलेला शब्द त्याने मार्क केला. वेळ मिळाला तसा त्याचा अर्थ काढून वाचला. या पुस्तकाने हि एक झालेली ज्ञानात भर! या पुस्तकाने मला खरं काय दिलं असेल तर ते... "हर हर महादेव" या ओळीचा अर्थ. "हर हर महादेव" निर्माण होण्याला एक मस्त कारण दिलयं पुस्तकामध्ये. कदाचित ते खोटं पण असेल. पण मी त्या तर्कासाठी लेखकाला मानलं. या लेखकाने असा बराच वैचारीक अभ्यास केलाय हे पुस्तक लिहिताना असं पानो-न-पानी भासतं.
एकंदरित काय!? वाचत रहायचं.