अर्थ शोधण्याचा आपण एकसारखा प्रयत्न करतो. आपल्या परीने अर्थ लावतो. आखाडे बांधतो. अनुभवावरुन काही अनुमाने काढतो. सिध्दातांच्या चौकटी स्वतःभोवती उभारतो. काय म्हणजे यश आणि काय म्हणजे अपयश, याचे आपल्या कल्पनेप्रमाणे हिशेब मांडतो. त्या हिशेबांच्या आधाराने यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी रक्ताचे पाणी करुन धडपड करतो. एका मर्यादेत यशस्वी होतो. मग स्वतःला सांगतो की, मी बुवा असा. इतरांना पटवतो की, मी हा असा, माझी आई अशी, माझे वडील असे. हे आमचे खानदान. हे आमचे सत्त्व. हे आमचे तत्व. आम्ही म्हणजे असे वागणार. दुसरी दिशा आमची नाही. आम्ही असेच चालणार. प्राण गेला तरी बदलणार नाही. वगैरे वगैरे खूप. सारे अगदी खरेखुरे असते. निदान आपल्याला तरी ते तसे खरेखुरे वाटत असते. आपल्यापुरते ते अगदी कालत्रयी बदलणार नसते.
आणि एकदम काहीतरी घडते! वरवर पाहता अगदी क्षुल्लक वाटणारे. सहजपणे घडून जाणारे. आणि मग पाहावे तर ही क्षुल्लक गोष्टच सारे जीवन उद्ध्वस्त करुन टाकते. आपल्याला आजवर कळलेला आयुष्याचा अर्थ चुकीचाच होता, असे जाणवून देते. पण तोवर फार उशीर झालेला असतो. कुठे चुकले हे समजायच्या आतच सारे काही पार हाताबाहेर गेलेले असते. इतकी वर्षे एकाच दिशेने चालल्यामुळे दुसरी दिशा जणू समजत नाही. दुसरा अर्थ पटत नाही. नवीन कल्पनांच्या नव्या चौकटी पुन्हा उभारणे सोपे नसते. मग काय करावे ते समजत नाही. आपण नुसते हताश होतो. हतबल होतो. दिङमूढ होतो. आणि मनाची शांती कायमचीच गमावून बसतो.
- रत्नाकर मतकरी (गहिरे पाणी - वारस)