तूझा नवा सिनेमा पाहिला! म्हंजे "जोधा अकबर". प्रदर्शित होण्यापुर्वीच एवढी हवा होती की तो बघण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. खरंच भव्य सिनेमा बनवला आहेस. गाणी तर अप्रतीम, याचं सगळं श्रेय आपण रेहमान देवालाच द्यायला हवयं. दुसरा पर्यायच नाहीये!
असो! सिनेमा ठीक झालाय. मला जास्त आवडला नाही. अपेक्षापुर्ती झाली नाही. सिनेमामघ्ये फक्त भव्यपणा जाणवला, दिव्यपणा अजिबातच दिसला नाही. प्रसारमाध्यमांनी याचे एवढं का कौतुक केलं ते पण मला
कळलं नाही!
सिनेमा चालू होऊन एक तासाने मी शैलूला सांगितलं, "अरे! मजा येत नाहीये रे!"शैलू म्हणाला, " डॉक्युमेन्टरी बघतोय असं वाटतयं. एक खर्चिक डॉक्युमेन्टरी!" डॉक्युमेंटरी वरुन आठवलं, "वळु" पाहीलास? अरे! काय धमाल सिनेमा आहे रे! फुल्ल पैसा वस्सुल!! चित्रीकरण तर अप्रतिम!
सुडी पण वैतागला होता. खुप अनफीनिश्ड काम आहे म्हणाला! हत्तीसोबतच्या कुस्तीचे जाम कौतुक झाले होतं पण प्रत्यक्षात मात्र तो एक पोरखेळच वाटला मला! अकबर हत्तीवर स्वार होताच तो कसा त्याला काबु होतो हे एक अजब कोडंच आहे. या गज-अकबर युध्दासाठी बनवलेला सेट पण तेवढाच तकलादु वाटतो. गमंत म्हणजे हा हत्ती आक्रमक किंवा हिंसक वाटण्यापेक्षा मोनिषाला तो "क्युट" वाटला.
अकबराच्या भुमिकेसाठी ह्रतिक कितपत योग्य आहे, होता ते मला माहीत नाही. पण जोधाच्या भुमिकेसाठी ऍश्वर्या नक्कीच नाही. ती तलवार वगैरे चालवताना दाखवलीयं पण तिच्या मध्ये तो करारी पणा जाणवला नाही. तो मला धूम-२ मध्ये सुध्दा दिसला नव्हता. हि बाई फक्त दिसायला अतिसुंदर आहे एवढचं मी म्हणू शकेन.
सिनेमा मध्ये नितीन काकांनी पण खुपच भ्रमनिरस केला! त्यांचे सेटमध्ये प्लास्टर ऑफ पँरीस खुप वेळा दिसला. रंग कमी पडला की काय असं वाटायला लागलं होतं. अकबर स्वता:च्या भावाला जेव्हा ढकलून देण्याची शिक्षा देतो, त्यावेळेचा सेट म्हणजे अक्षरशः थुक लावण्याचा प्रकार वाटला. कड्यावरच्या फळ्या दिसतातच आणि पाठीमागचे पडदे म्हणजे मागचा कचरा झाकण्यासाठी लावलेले वाटतात. पण त्यांचं एकंदरीत काम अफलातूनच आहे यात वाद नाहिये.
कोणत्या तरी वर्तमानपत्रामध्ये आलं होतं की, "बघा आणि थक्क व्हा" मी बघून थक्क झालोच. का बघीतला याचं कारण मी शोधण्याचा प्रयत्न केल्यावर आढळलं की तुझ्यावरचा विश्वास! पण तो फोल ठरला! सिनेमा बघून काय आठवतयं असं कोणी विचारल्यावर मला फक्त ऍश्वर्याचे दागिने तेवढे आठवतात!!
असो. बाकी सिनेमा बराच (लांब आणि खर्चिक) होता.
घरी सगळे कसे आहेत? सगळ्यांना विचारलयं म्हणून सांग. निकूदादा कालच नेपाळ टूर करून आला. ती पण खर्चिक होती म्हणे.
तुझ्या पुढच्या सिनेमासाठी हार्दीक शुभेच्छा! तो सुध्दा किती ही बरा असला तरी पण मी तो थिएटरलाच पाहीन. तुझ्यावरचा विश्वास कायम आहे. तो तसाच राहु दे रे बाबा!!
चल मग परत लिहेन, तोपर्यंत नमस्कार!!!
- मंगेश